शिवाजी महाराज अद्यापही महाराष्ट्राला कळालेले नाहीत – बाबासाहेब पुरंदरे


मुंबई – आपल्याला आज शिवाजी महाराज फार थोडे कळाले आहेत. आम्हाला शिवचरित्र शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतेच माहित असल्याचे मत एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडले आहे.

शिवाजी महाराज आज आपल्याला फार थोडे कळतात. आम्हाला फक्त चित्र कळले आहे, चारित्र्य कळालेले नाही. आम्हाला शिवचरित्र शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतेच माहिती आहे. पण त्यांनी ज्या लोकांच्या नित्य उपयोगाच्या गोष्टी केल्या आहेत त्या माहिती आहेत का?. त्या माहिती पाहिजेत, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी पुढे म्हटले आहे.

शिवाजी महाराज मराठी माणसाला कळले आहेत का? असा सवाल बाबासाहेब पुरंदरे यांनी करण्यात आला होता. यावेळी त्यांनी १२ १५ वर्षाचे महाराज सुद्धा कळलेले नाहीत. महाराजांचे वय १२ वर्ष होते, त्यावेळी त्यांनी जे केले, ते सुद्धा आम्हाला कळलेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शासनाची, राज्यकर्त्यांची गडकिल्ल्यांबाबत अनास्था का आहे असे विचारले असता बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ज्याला हौस नाही त्याने लग्न करु नये, अशी म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीप्रमाणे माणूस हौशी पाहिजे, नवीन करण्याची हौस पाहीजे. शिवाजी महाराजांना ती हौस होती, त्यामुळे त्यांनी गडकिल्ले बांधले. आता ती हौस जागी करण्याचे काम आपल्या अभ्यासकांनी करायला हवे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. शालेय जीवनातील करामतींमुळे मोठ्या लोकांचा मार खाल्ला असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्यांनी त्यांच्या शिक्षकांबद्दलही आठवणी सांगितल्या.