राज्यात भाजपचे चार केंद्रीय मंत्री काढणार ‘जन आशीर्वाद यात्रा’


मुंबई – राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ.भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे.

यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर , नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदार संघात ६२३ किलोमीटर प्रवास करेल.

नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरु होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. आमदार निरंजन डावखरे, आमदार सुनील राणे, आमदार अशोक उईके, प्रमोद जठार, राजन नाईक हे या यात्रांचे समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही केळकर यांनी नमूद केले.