लावाचे फोन डिझायनिंग चॅलेंज, ५० हजाराचे इनाम

स्वदेशी मोबाईल फोन कंपनी लावाने डिझाईन इन इंडिया चॅलेंज लाँच केले असून कंपनीचे हे दुसरे चॅलेंज पर्व आहे. यात कंपनीच्या आगामी लावा फोनचे डिझाईन करण्याचे चॅलेंज दिले गेले असून विद्यार्थी आणि वर्किंग प्रोफेशनल त्यात सहभागी होऊ शकणार आहेत. टीम बनवून सुद्धा हे काम करता येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तीन जणांची टीम बनविता येईल.

सहभागी होणाऱ्यांनी कोणत्याही संस्थेतून डिझाईन प्रोग्राम, बीटेक, बीई अथवा अन्य पदवी मिळविलेली असावी. या साठीची नोंदणी १५ ऑगस्ट पासून सुरु होऊन २५ ऑगस्ट पर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून चालू राहणार आहे. त्यासाठी टीम लीडर ई मेल अथवा मोबाईल नंबर चा वापर करू शकतील. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रोख पारितोषिक दिले जाणार आहे. शिवाय कंपनीत नोकरीची संधी सुद्धा मिळू शकणार आहे.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवसाय प्रमुख सुनील रैना म्हणाले, आम्ही दिवाळीपूर्वी फाईव्ह जी स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखली असून हा फोन २० हजार रुपयापेक्षा कमी किमतीत येईल. पुढच्या दोन तीन वर्षात मोबाईल अॅक्सेसरीज सेगमेंट मध्ये २० टक्के भागीदारी साठी आम्ही प्रयत्न करत आहोत. १५ हजार रेंज मध्ये स्मार्टफोन वर आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे.