नीरजच्या गावात जंगी मेजवानीची तयारी सुरु

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भालाफेकीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज त्याच्या गावी लवकरच जात असून त्याच्या स्वागतासाठी जंगी मेजवानीची तयारी सुरु झाली आहे. १५ ऑगस्ट नंतर नीरज कधीही गावी पोहोचेल हे लक्षात घेऊन २० हजार जणांना मेजवानी देण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी १०० हलवाई कामाला लागले आहेत. ५ हजार किलो लाडू, ३५०० किलो गुलाबजाम आणि १५०० किलोची जिलेबी तयार केली जात आहे.

नीरजचे काका सुरेंद्र म्हणाले, नीरज आता कधीही घरी येईल. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल ही मेजवानी दिली जात असून सर्वांचे तोंड गोड केले जाणार आहे. हरियाना मध्ये अशी परंपरा आहे जो पाहुणा भेटीला येईल त्याला जेऊ खाऊ घालूनच त्याची पाठवणी केली जाते. अडीच हजार लोकसंखेच्या पानिपत जिल्ह्यातील खंडरा गावात नीरजचे घर आहे.

नीरजचे वडील सतीश म्हणाले, आज देशभर नीरजचे चाहते आहेत. नीरज येईल तेव्हा त्याच्या भेटीसाठी अनेक लोक येणार आहेत. त्यांना मेजवानी दिली जाणार आहे. त्यासाठी गावात चार तंबू मध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे. पुरुष आणि महिला यांच्यासाठी स्वतंत्र सोय आहे. नीरज साठी स्टेज उभारले आहे त्यामुळे पाहुणे त्याला सहज पाहू शकतील.