या न्यायालयात एकही केस नाही पेंडिंग

न्यायनिवाडे लवकर होऊन जनतेला लवकर आणि योग्य न्याय मिळावा यासाठी देशभरात लाखो न्यायालये आहेत पण प्रलंबित दाव्यांची संख्या सुद्धा कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात सिमलावदा या छोट्याश्या गावात मात्र एक न्यायालय असे आहे जेथे एकाही दावा पेंडिंग राहत नाहीच पण निकालावर कुणी अपील सुद्धा करत नाही.

हे न्यायालय शंभोशिवाचे न्यायालय आहे. भोलेनाथाच्या मंदिरात शंकराला साक्षी ठेऊन न्यायनिवाडा केला जातो आणि जो निर्णय झाला तो भोलेनाथाने दिला असे मानले जाते. त्यासाठी मंदिर सदस्य समिती गेली २७ वर्षे असे न्यायनिवाडे करत आहे. या समिती मध्ये १०८ सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे त्यात गावातील ज्येष्ठांबरोबर शिकले सवरलेले तरुणही आहेत.

घरातले वाद, शेतीचे वाद, वाटण्या, देवघेव असे अनेक प्रकारचे खटले येथे गावकरी आणतात. काही वेळा सदस्य संबंधित जागेवर जाऊन पाहणी करतात आणि निकाल देतात. हा निकाल वादी, प्रतिवादी दोघेही मान्य करतात. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायची वेळ आलीच तर प्रथम मंदिरात येऊन शंकरासमोर गाऱ्हाणे घातले जाते आणि मगच तक्रार नोंदविली जाते असेही सांगतात.