भारताबरोबरच या देशांचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्टच

भारत यंदा स्वातंत्र मिळाल्याचा ७५ वा वाढदिवस साजरा करत असून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे. करोना मुळे प्रेक्षकांची संख्या मर्यादित राहणार आहे. विशेष म्हणजे भारताबरोबरच जगात असेही आणखी देश आहेत, ज्यांचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट रोजीच साजरा होतो.

भारताला २०० वर्षांच्या ब्रिटीश शासनातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. १५ ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करून ध्वजारोहण करतील.

भारताबरोबर १५ ऑगस्ट हाच स्वातंत्रदिन म्हणून साजरा करणारे अन्य देश आहेत. उत्तर कोरिया आणि द.कोरिया या दोन्ही देशांना जपानपासून याच दिवशी स्वातंत्र मिळाले आहे. दोन्ही देशात या दिवशी सुट्टी दिली जाते. १९४५ मध्ये अमेरिका आणि सोविएत सेनांनी कोरियात चढाई करून ३५ वर्षापासून असलेला जपानी कब्जा संपुष्टात आणला आणि कोरिया स्वतंत्र राष्ट्र झाले. १९४८ मध्ये या देशाची फाळणी होऊन सोव्हिएत समर्थक उत्तर कोरिया आणि अमेरिका समर्थक दक्षिण कोरिया अशी विभागणी झाली.

लिन्टेस्टेन हा जगातील छोट्या देशांपैकी एक देश. १८६६ मध्येच त्याला जर्मन रुलर्स पासून सुटका मिळाली पण त्यांचा स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट १९४० पासून साजरा होऊ लागला. या दिवशी या देशात सुद्धा सार्वजनिक सुट्टी असते.

बहारीन हा देश दिल्मुन संस्कृतीची प्राचीन भूमी मानला जातो. १५ ऑगस्ट १९७१ मध्ये या देशाने ब्रिटीशांशी लढून स्वातंत्र मिळविले. १९ व्या शतकात ब्रिटिशांच्या पूर्वी बहारीन वर अरब आणि पोर्तुगाल सह अनेक देशांनी राज्य केले आहे.

द डेमोक्राटिक रिपब्लिक ऑफ कांगो १५ ऑगस्ट १९६० मध्ये फ्रांस शासकांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला. मध्य आफ्रिकेतील या देशाला फ्रांसने गुलाम बनविले होते. सुरवातीला याचे नाव फ्रान्सिसी कांगो होते ते १९०३ मध्ये मध्य कांगो असे झाले होते.