पंतप्रधान मोदींचे रक्षाबंधनाआधी महिलांना स्पेशल गिफ्ट


नवी दिल्ली: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आत्मनिर्भर नारी शक्ती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला. त्यांनी त्यात महिला उद्योजकांसाठी महत्त्वाची घोषणा केली. १ हजार ६२५ कोटी रुपयांची रक्कम महिला उद्योजकांना देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधान मोदींनी आज दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित महिला स्वयंरोजगार गटांच्या सदस्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी यावेळी महिलांमधील उद्योजकांना वाव देण्यासाठी, त्यांच्या उद्योगविश्वाची व्याप्ती वाढवण्यासाठी आज मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात येत असल्याचे म्हणाले. खाद्यपदार्थांवरील प्रक्रिया असो वा महिला शेतकरी उत्पादक संघ असो किंवा मग दुसरे स्वयंरोजगार समूह, महिलांच्या लाखो गटांना १ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिकची मदत देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.

महिलांनी कोरोना काळात स्वयंरोजगार गटांच्या माध्यमातून देशाची सेवा केली. भगिनींनी केलेले काम अभूतपूर्व असल्याचे गौरवोद्गार देखील मोदींनी काढले. मास्क आणि सॅनिटायझर तयार करणे असो वा गरजूंपर्यंत जेवण पोहोचवणे, स्वयंरोजगार गटाच्या माध्यमातून महिलांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा कित्येक महिलांकडे बँक खाते नव्हते. त्या बँकिंग यंत्रणेपासून कोसो मैल दूर होत्या. त्यामुळेच आम्ही जनधन खाती उघडली, असे मोदींनी सांगितले.