संसदेत संभाजीराजेंना बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी; अशोक चव्हाण


मुंबई- महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी संसदेत आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत बाळगलेल्या मौनातून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलत होते. चव्हाण म्हणाले की, आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा भाजपच्या या दोन्ही नेत्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार राहिलेले नसताना तत्कालीन भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले, हे सिद्ध झाले आहे.

शिवाय आता ती चूक दुरुस्त होत असताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी चकार शब्दही काढला नाही. याबाबत राज्यसभेत बोलण्यासाठी खासदार संभाजी राजे यांनी वेळ मागूनही दुर्दैवाने त्यांना वेळ देण्यात आली नाही. शेवटी विरोधी पक्ष आक्रमक झाले व त्यानंतर त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या साऱ्या प्रकारातून मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही कडाडून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी व्यवस्थित वाचला पाहिजे. ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याची मागणी ही सबब नाही. याच आरक्षण मर्यादेमुळे मराठा आरक्षण फेटाळले गेले, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ही मागणी राज्याने आता केलेली नसून, मागील अनेक महिन्यांपासून आम्ही याबाबत सातत्याने बोलतो आहोत.

राज्यांचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार संसदेत पुन्हा बहाल केले जात असताना त्याचवेळी ही मर्यादा देखील शिथिल करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली. त्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, खा. अधिर रंजन चौधरी, खा.डॉ. अभिषेक मनू सिंघवी, खा. बाळूभाऊ धानोरकर, शिवसेनेचे खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, खा. प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण यांनी भक्कमपणे बाजू मांडली. मराठा आरक्षणाच्या संसदेतील लढ्याचे ते योद्धे आहे. पण खासदार संभाजी राजे यांचा अपवाद वगळता भाजपचे इतर खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. लोकसभा व राज्यसभेत काय घडले, ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले. आता भाजपने मराठा समाजाची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तरी ते त्याला बळी पडणार नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.