कोरोना लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यातील 7 हजार 636 जणांना कोरोनाची पुन्हा लागण


पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही धोका टळलेला नसल्याचे वारंवार आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. पण, लसीकरण केल्यानंतर काही नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशा नागरिकांकडून कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही.

दरम्यान आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील 7 हजार 636 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या 5 हजार 466 तर दुसरा डोस घेतलेल्या 2 हजार 170 जणांचा समावेश आहे. लसीकरणानंतर कोरोनाचे लक्षणे सौम्य अथवा अतिसौम्य दिसू शकतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य होते, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

6 ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्यात 63,25,579 जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी 46,85,381 जणांचा पहिला डोस, तर 16,40,198 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. पहिल्या डोस झाल्यावरही 5466 जणांना कोरोनाची लागण झाली. तर दुसरा डोस घेतल्यानंतरही 2170 जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले.

आपल्याकडे अपेक्षित असे लसीकरण झाले नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर येत असल्यामुळे अशा लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसतात. त्यांच्याकडून अन्य लोकांना संसर्गाचा धोका आहे. अमेरिकतेही लसीकरणानंतर सर्व व्यवहार खुले झाले. पण, त्यानंतर बाधितांची संख्या वाढल्यामुळे लस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले.

पहिली लाट डिसेंबरमध्ये ओसरु लागल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नागरिक पर्यटनासाठी, वैयक्तिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेत झाला. दुसरी लाटही आता ओसरू लागल्यामुळे तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.