लिपस्टिक वापरताय? मग हे वाचा

मेकअप मधील एक महत्वाचे आणि सर्रास वापरले जाणारे प्रसाधन म्हणजे लिपस्टिक. करोना काळात मास्क वापरणे बंधनकारक झाल्यामुळे भले लिपस्टिकचा वापर थोडा कमी झाला असेलही पण करोना ओसरू लागल्यावर त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ओठ अधिक उठावदार दिसावेत यासाठी अनेक महिला दररोज लिपस्टिकचा वापर करतात. पण लिपस्टिक सौंदर्य वाढवत नाही तर उलटे कमी करते याची जाणीव अनेकांना नाही. लिपस्टिक मुळे चेहरा भले सुंदर दिसत असेलही पण शरीर मात्र आतून अनेक व्याधींनी पोखरले जाते असे अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून दिसून आले आहे.

या संशोधन आणि सर्व्हेक्षणात असे दिसून आले की वर्षाकाठी लिपस्टिक वापरणारी एक महिला सरासरी २२ ग्राम लिपस्टिक खाते. म्हणजे लिपस्टिक सह खाणे, पिणे यामुळे तिच्या पोटात २२ ग्राम पर्यंत लिपस्टिक जातेच. जगातील बहुतेक सर्व महागड्या ब्रांडच्या लिपस्टिक मध्ये सुद्धा फ्लोरिन नावाच्या रसायनाचा वापर केलेला असतो आणि वाईट म्हणजे हे रसायन लिपस्टिक मध्ये वापरले गेले आहे याचा कुठेही उल्लेख केलेला नसतो.

अमेरिकेच्या सायन्स अँड टेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार जगातील बड्या देशातील टॉपचे लिपस्टिक ब्रांड त्यांच्या लिपस्टिक मध्ये फ्लोरिन वापरतात. हे रसायन लिपस्टिक सोबत पोटात गेल्याने यकृताशी संबंधित आजार वाढतात, पचन बिघडते, थायरॉईड विकारासाठी सुद्धा हे रसायन कारणीभूत ठरते आणि अनेकदा कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात.

सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या ९३ टक्के टॉप ब्रांड पैकी ६२ टक्के ब्रांड मध्ये या रसायनाचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. डोळ्यासाठी मस्कारा बनविणाऱ्या ८२ ब्रांड मध्ये सुद्धा फ्लोरिनचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. आणि या बाबत माहिती देऊनही महिला लिपस्टिक आणि मस्काराची खरेदी करतच आहेत. कॉस्मेटिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार करोना पूर्व काळात महिला एकावेळी किमान ३ ते ४ शेडच्या लिपस्टिक खरेदी करत होत्या. आता मास्क वापरावे लागत असल्याने ही खरेदी १ ते २ शेडवर आली आहे. मात्र लिपस्टिकचे भूत महिलांच्या मनावर इतके गारुड करून आहे की मास्कच्या आत सुद्धा अनेक महिला रोजची सवय म्हणून लिपस्टिक वापरतात.