भारतात बीटकॉइन देऊन खरेदी करता येणार पिझ्झा, कॉफी, आईसक्रीम

भारतातील ज्या लोकांनी क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्याजवळ बीटकॉईन आहेत त्यांच्या साठी ही बातमी आहे. बीटकॉईन आहेत पण त्याचा वापर कसा करावा याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल तर तो या बातमीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे.

क्रिप्टो एक्स्चेंज व क्रिप्टोकरन्सी वॉलेट युनीकॉईनने भारतात त्यांच्या ग्राहकांसाठी रोजच्या गरजा असलेल्या वस्तू खरेदीची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार यादी मधील कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आता कॅश मोजायची गरज नाही तर त्याऐवजी डिजिटल कॉईन वापराचे व्हाऊचर वापरून या वस्तू खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी बीटकॉईन किमतीची १०० रुपयापासून ५ हजार रुपये रेंज मधली व्हाऊचर खरेदी करता येणार आहेत. कोणत्या ब्रांडच्या वस्तू खरेदी करता येतील त्याची माहिती मोबाईल अॅप वर मिळणार आहे.

ज्या वस्तूच्या खरेदीसाठी व्हाउचर खरेदी केली तेवढी रक्कम क्रिप्टो वॉलेट मधून बीटकॉईन खात्यातून कमी केली जाणार आहे आणि व्हाऊचर कोड पाठविला जाणार आहे. ग्राहक पिझ्झा, बर्गर, कॉफी, आईसक्रीम सह अनेक प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करू शकतील. युनीकॉईन पूर्वी, जेब पे ने फ्लिपकार्ट बरोबर बीटकॉईन कस्टमर व्हाऊचर साठी पार्टनरशिप केली होती.

युनीकॉईनने आत्तापर्यंत ९ कोटी डॉलर्सचा फंड मिळविला असून आठ वर्षापूर्वी या क्रिप्टो वॉलेटची सुरवात झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी एक्स्चेंज सुरु केले आहे.