म्हणून साजरी होते नागपंचमी
यंदा १३ ऑगस्ट रोजी देशभर नागपंचमीचा सण साजरा होत आहे. भगवान शिव आणि त्यांच्या गळ्यातील नाग यांची पूजा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून केली जाते. श्रावणातील पंचमी नाग पंचमी म्हणून साजरी होते. या दिवशी नाग पूजा केल्यास सर्प दंशाचे भय राहत नाही असा विश्वास आहे. नाग आणि शिव पूजन जीवनातील दुखे कमी करतात असेही मानले जाते.
पुराण काळापासून हिंदू धर्मात नागाला देवता मानले गेले आहे. शिवाच्या गळ्यात नाग असतो तर विष्णू शेषशायी म्हणजे शेष नागाच्या वेटोळ्यावर विश्रांती घेतो. अगदी अमृत मंथन करताना सुद्धा वासुकी नाग दोरी म्हणून वापरला गेला होता. पुराणात दिव्य नाग, नागलोक याची अनेक वर्णने आहेत.
भारतात उत्तर भागात आणि पूर्व भागात काही ठिकाणी श्रावण कृष्ण पंचमीला नागपूजा केली जाते तर बाकी भागात शुक्ल पंचमीला नागपूजन केले जाते. दुध, लाह्या घालून नागाची पूजा होते. अनेक ठिकाणी वारुळे असतील तेथे जाऊन पूजा केली जाते आणि नागाकडे संरक्षण दे अशी मागणी केली जाते. ज्या लोकांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे तो नागपूजा केल्याने नष्ट होतो असे मानले जाते.
पुराणातील कथेनुसार परीक्षित राजाला तक्षक नागाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला तेव्हा तक्षकाचा सूड घेण्यासाठी परीक्षित राजाचा मुलगा जनमेजय याने सर्पयज्ञ करून सर्व सर्पांना जाळून टाकण्याचा उद्योग सुरु केला. तक्षक पाताळात लपला होता पण ऋषींच्या मंत्रोच्चारामुळे तो आपोआप यज्ञाच्या जागी खेचला गेला तेव्हा त्याने देवानां जीव वाचवा म्हणून प्रार्थना केली. तेव्हा अगस्ती ऋषीनी ब्रह्माकडून वर मिळविला आणि नागांचा जीव वाचवला. ती तिथी पंचमी होती आणि जनमेजयाचा यज्ञ समाप्त झाला ती तिथी श्रावणातील पंचमी होती.
म्हणून महाभारत कालापासून पंचमीला नाग पूजा करण्याची प्रथा पाळली जाते.