फेसबुकला टिकटॉकची धोबीपछाड

चीनी शॉर्ट व्हिडीओ अॅप टिकटॉकने, भारत अमेरिकेसह जगातील अन्य अनेक देशांनी बंदी घालण्यासह उत्पन्न केलेले अनेक प्रकारचे वादविवाद आणि आरोपप्रत्यारोप झेलूनही जगातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप बनण्याची कामगिरी बजावली आहे. आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप म्हणून फेसबुक एक नंबरवर होते. बिझीनेस जर्नल आशिया निक्केईच्या रिपोर्टनुसार टिकटॉकची लोकप्रियता सतत वाढती राहिली असून त्याने फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे.

भारताने टिकटॉक सह अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आहे तर ट्रम्प प्रशासन काळात अमेरिकेत टिकटॉकवर अनेक निर्बंध होते. जो बायडेन अध्यक्षपदी आल्यावर हे निर्बंध उठविले गेले. त्यात करोना काळात लॉकडाऊन मुळे घरात अडकून पडलेले युजर्स मोठ्या प्रमाणावर टिकटॉककडे वळले. त्याचा फायदा टिकटॉकला मिळाला. यापूर्वी २०१८ मध्येही टिकटॉक सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप होते पण त्यानंतर त्यावर अनेक ठिकाणी बंदी आल्याने त्याचे स्थान घसरले होते आणि २०१९ मध्ये ते चार नंबरवर गेले होते.

अमेरिका आणि ब्रिटन मध्ये टिकटॉकचे एकूण व्ह्युज युट्यूब पेक्षा जास्त आहेत. २०२० मध्ये सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप मधील टॉप १० मध्ये अमेरिकेतील सात अॅप होती आणि त्यातील चार फेसबुकची होती. व्हॉटसअपने नवी प्रायव्हेट पॉलिसी लागू केल्याने त्यांचे युजर्स घटले असे समजते. एका आकडेवारीनुसार टिकटॉक युजर्सची संख्या ३ अब्जांच्या वर गेली आहे.