चीनचा महानेता  माओ त्से तुंगला होत्या या विचित्र सवयी

चीनला जगाच्या नकाशावर महासत्ता म्हणून ओळख देणारा, जगातील बलशाली नेत्यांमध्ये एक नेता माओ त्से तुंग म्हणजे माओ जे डोंग याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कधी बोलले जात नाही अथवा छापून येत नाही. २२ वर्षे सतत माओ सोबत असलेल्या त्याच्या डॉक्टरने म्हणजे डॉक्टर जी शी ली यांनी लिहिलेल्या ‘ द प्रायव्हेट लाईफ ऑफ चेअरमन माओ’ मध्ये त्याच्या अनेक विचित्र सवयीबद्दल माहिती दिली आहे. या डॉक्टरने बायको मुलांसह देश सोडल्यावर हे पुस्तक प्रकाशित केले होते असे समजते.

डॉ. ली यांच्या म्हणण्याप्रमाणे माओने झोपेतून उठल्यावर कधीच दात घासले नाहीत. त्या ऐवजी तो चहाच्या गुळण्या करत असे. शेवटी शेवटी तर त्याचे दात रंगविल्यासारखे हिरवे दिसत असत. माओला अंघोळ करायचा विलक्षण तिटकारा होता. त्यामुळे तो कधी तरीच अंघोळ करत असे.

माओच्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा सुद्धा विचित्र होत्या. तो रात्रभर काम करत असे आणि पहाटे जेव्हा बाकी लोक झोपेतून जागे होतात तेव्हा झोपत असे. त्याला स्वतःच्या पलंगाशिवाय झोप येत नसे त्यामुळे परदेशात जाताना सुद्धा त्याचा पलंग सोबत नेला जात असे.

२६ डिसेंबर १८९३ साली सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माओचा टाईम मासिकाने २० व्या शतकातील १०० प्रभावशाली व्यक्ती यादीत समावेश केला होता. माओ याला महान प्रशासक मानले जाते. मात्र त्याने अनेक चुका सुद्धा केल्या होत्या ज्यात कोट्यवधी चीनी लोकांचे जीव गेले. ‘फोर पेस्ट कॅम्पेन’ हे त्यातील एक. १९५८ मध्ये त्याने डास, माश्या,उंदीर आणि चिमण्या मारून टाकण्याचे आदेश दिले होते त्याचा उलटा प्रभाव पडला. चीनला भयंकर दुष्काळाला सामोरे जावे लागले आणि उपासमारीने सुमारे दीड कोटी नागरिक मरण पावले.