इस्त्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी, या कारणाने महत्वाचे होते प्रक्षेपण
भारतीय वैज्ञानिकांना १२ ऑगस्ट या दिवशी मोठे यश मिळण्याची संधी हुकली असून इस्रोने प्रक्षेपित केलेला देशाचा पहिला, खास अर्थ ऑब्झर्व्हेशन उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापन करण्याचे केलेले प्रयत्न ऐनवेळी उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले. उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले पण तो कक्षेत स्थापन करता आला नाही. अनेक कारणांनी हे प्रक्षेपण महत्वाचे होते.
मुख्य म्हणजे १२ ऑगस्ट हा महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचा जन्मदिवस. त्या अर्थाने हे प्रक्षेपण विशेष होते. हा इमेजिंग उपग्रह दोन टनी वजनाचा होता आणि इस्त्रोने प्रथमच ओगीव्ह शेपचा बंदुकीच्या गोळीच्या आकाराचा उपग्रह तयार केला होता. या शेप मुळे उपग्रहाची पेलोड क्षमता वाढते. हा उपग्रह ३६ हजार किलोमीटर उंचीवरील कक्षेत स्थापन केला जाणार होता. यामुळे ईओएस-०३ प्रक्षेपित करून भारत जगातील सर्वात दूर संवेद उपग्रह समूह देशातील एक बनणार होता.
या उपग्रहाचा उपयोग कृषी, संरक्षण, पूर, चक्रीवादळे यासारखा नैसर्गिक आपत्ती, नगर नियोजन, ग्रामीण विकास, खनिज सर्व्हेक्षण, पर्यावरण अशा अनेक कारणांनी होऊ शकणार होता आणि तो भारतासाठी गेम चेंजर ठरला असता असे सांगितले जात आहे. संरक्षणासाठी सुद्धा याचा वापर होणार होता आणि विशेषतः सीमा सुरक्षेसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरला असता असे समजते.