औकात क्या है तुम्हारी, क्यों लालू परिवार के पीछे पडे हो? असे म्हणत तेज प्रताप यादव पत्रकारांवर भडकले


पटना – तेजस्वी यादव यांचा फोटो राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) पोस्टरवर नसल्याच्या मुद्यावरून विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांवरुन तेज प्रताप यादव यांनी पत्रकारांवर टीका केली आहे. लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यांच्याबाबत होत असलेल्या चर्चामुळे त्यांनी एका फेसबुक व्हिडीओमध्ये पत्रकारांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

तेज प्रताप यांनी फेसबुक लाइव्ह व्हिडिओमध्ये पत्रकारांना बदनामीचा खटला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि म्हटले, औकात क्या है तुम्हारी, क्यों लालू परिवार के पीछे पडे हो? धाकटा भाऊ तेजस्वी यादव यांचे छायाचित्र पक्षाच्या पोस्टरमध्ये नसल्याच्या मुद्द्यावरून सोमवारी फेसबुक लाईव्हवर तेज प्रताप आले होते. त्यांनी रागाच्या भरात पत्रकारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

पत्रकारांना तेज प्रताप यांनी आव्हान देत म्हटले, तुम्ही लोक काय आहात? मी तुमच्या सर्वांच्या पोर्टल विरोधात बदनामीची याचिका आणि गुन्हा दाखल करेन. मी माझ्या वकिलाला फोन करून प्रत्येकाच्या विरोधात गुन्हा दाखल करेन. बिहारच्या विकल्या गेलेल्या माध्यमांनी ऐकले पाहिजे की मी तुमच्यावर बदनामीचा खटला दाखल करेन, मी जे सांगितले ते मी करेन, असे म्हटले आहे.

तेज प्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करताना अनेक पत्रकारांची नावे दिली जे त्यांच्या मते त्यांच्याविरुद्ध प्रचारात सामील आहेत. तेज प्रताप यादव यांनी त्यांना बदनामीच्या खटल्यांची धमकी दिली. लालू यादव, राबडी देवी, मीसा भारती आणि त्यांचे फोटो पोस्टरमधून गायब असताना माध्यमांनी निवडणुकीच्या वेळी गोंधळ निर्माण केला का, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, तेज प्रताप आणि तेजस्वी यादव यांच्यात बिहारच्या राजकीय वातावरणात पक्षांतर्गत वर्चस्वाच्या लढाईवरून वाद निर्माण झाला आहे. रविवारी झालेल्या बैठकीनंतर तेज प्रताप पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्या हृदयात तेजस्वी राहतो. बॅनर आणि पोस्टरमध्ये त्याचा फोटो नसल्यास काय फरक पडतो? तेजस्वी माझा अर्जुन आहे. ते मुख्यमंत्री होणार आहेत.