दडी मारुन बसलेला मान्सून येत्या 4 ते 5 दिवसांत पुन्हा सक्रिय होणार


मुंबई: महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने जाहीर केला आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. तर, पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

प्रादेशकि हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. जून आणि जुलैमध्ये बारामती परिसरात थोड्या प्रमाणात पाऊस झाला. पण, गेल्या दोन-तीन दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्रतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाची एवढी तीव्रता वाढली आहे की रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे. आज बारामतीतील तापमान हे 32 अंशावर गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या तीव्रतेने शेतातील उभी पिके देखील धोक्यात येणार आहेत. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाची वाट पाहत आहे.