लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारत-इंग्लंडला दंडासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपदांच्या गुणांमध्ये कपात


दुबई – १२ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. पण या सामन्यापूर्वी, दोन्ही संघांना एक धक्का बसला आहे. षटकांची गती संथ राखल्याबद्दल, दोन्ही संघांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या गुणतालिकेमध्ये प्रत्येकी दोन गुण गमावले आणि यासह, दोन्ही संघाच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ही माहिती आयसीसीने बुधवारी दिली आहे.

नॉटिंगहॅममध्ये या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला होता. शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला होता. सामन्याचा निकाल पावसामुळे येऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सामना अनिर्णित राहिल्यानंतर, दोन्ही संघांना २०२१-२३ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी प्रत्येकी चार गुण देण्यात आले. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांनी षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर दोन्ही संघांच्या खात्यातून प्रत्येकी दोन गुण पेनल्टी ओव्हर म्हणून कापले गेले आणि आता दोघांचेही चारऐवजी प्रत्येकी दोन गुण आहेत. याशिवाय, दोन्ही संघांच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या ४० टक्के दंड भरावा लागेल.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला. यानंतर भारताने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात ३०३ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एका विकेटसाठी ५२ धावा केल्या होत्या आणि सामन्यात मजबूत स्थितीत मिळवली होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती, पण पावसामुळे सामना अनिर्णित राहिला.