कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राची मोठी तयारी


नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे आता देशभरात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर रेमडिसिविर इंजेक्शनच्या ५० लाख वायल संरक्षित केल्या आहेत. याशिवाय सरकार टोसिलजुमाबच्या प्रोडक्शनची सुद्धा तयारी करत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज१८ ला दिली आहे.

परिस्थिती ठिक होण्यासाठी आणि पुरेसा साठा झाल्यावर नोव्हेंबरपासून कोरोना लसीची पुन्हा निर्यात करण्याचा विचार सुद्धा सरकार करत आहे. परंतु सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष देशातच लसीकरणावर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसिविर आणि टोसिलजुमाब ही महत्त्वाची औषधे होती. या औषधांच्या उत्पादनात सरकारने वाढ करेपर्यंत त्यांची कमतरता होती. देशात रेमडिसिविरचे उत्पादन वाढविण्यात आले आणि स्विस कंपनी हॉफमॅनला रोसे यांनी त्यांनी पेटेंट केल्यामुळे टोसिलजुमाब बाहेरून मागविण्यात आले. टोसिलजुमाबचे उत्पादन आता भारतात केले जात असल्याचे केंद्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, रेमडिसिविरच्या ५० लाख वायल संरक्षित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत त्या त्वरित राज्यांमध्ये पाठवल्या जाऊ शकतील. न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या त्याचे सात परवानाधारक उत्पादक आहेत, ज्याची क्षमता दरमहा सव्वा कोटी वायल बनवण्याची आहे. आता या उत्पादकांनी तीन कोटी वायल तयार केल्या आहेत. लवकरच रेमडिसिविर निर्यातीची तयारी केली जात आहे.

लसीच्या निर्यातीचा प्रश्न आहे, तर नोव्हेंबरपासून सरकार निर्यात करण्यास सुरुवात करू शकते. तोपर्यंत देशात ६ स्वदेशी लस उत्पादक असू शकतात. त्यावेळी पुरेसा साठा असेल, असे मानले जाते. सरकारला निर्यात उघडण्यास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारखे मोठे उत्पादक सांगत आहेत. परंतु सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष देशात लसीकरणावर आहे. जानेवारीमध्ये भारताने लस मैत्री अंतर्गत लस निर्यात करण्यास सुरुवात केली. यावरून सरकारला विरोधकांच्या जोरदार आरोपांचा सामना करावा लागला आहे. ते बंद करेपर्यंत ६.६३ कोटी लसीनिर्यात करण्यात आल्या होत्या.

केंद्राने तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन इतर फ्रंटवरही तयारी केली आहे. सरकारने मंजूर केलेल्या एकूण १५७३ ऑक्सिजन प्रकल्पांपैकी २९३ प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारच्या विविध मंत्रालयांकडून ३५१ प्रकल्पही बसविण्यात येत आहेत. देशात सध्या एकूण १२४४ ऑक्सिजन टँकर आहेत. एप्रिलपासून २ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहेत. देशात १८ लाखाहून अधिक आयसोलेशन बेड आणि १.२५ लाख आयसीयू बेड आहेत. याशिवाय ५०,००० व्हेंटिलेटर्सही राज्यांना पुरवण्यात आले आहेत.