ऑक्सिजनच्या अभावामुळे आंध्र प्रदेशात कोरोनाबाधितांचा मृत्यू; आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती


नवी दिल्ली – आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाच्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटर सपोर्टवर असणाऱ्या काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे झाल्याची माहिती केंद्राने बुधवारी दिली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एखाद्या राज्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केंद्राने माहिती मागवली होती.

मंगळवारी आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या ९ ऑगस्टच्या पत्रानुसार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी, काही कोरोनाबाधितांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. १० मे रोजी श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया (एसव्हीआरआर) येथे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, घटनेच्या प्राथमिक तपासानुसार असे दिसून येते की १० केएल ऑक्सिजन टाकीचे सपाटीकरण आणि रुग्णालयातील बॅकअप मॅनिफोल्ड सिस्टीम सुरु करण्यादरम्यान ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला. त्यामुळे हे मृत्यू झाले आहेत.

राज्य आरोग्य मंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी तेलुगू देसम पक्षाचे खासदार के रवींद्र कुमार यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यसभेत सांगितले की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे, पण कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, भारत सरकारने राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य दिले आहे आणि आर्थिक मदत पुरवली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार ऑक्सिजनची मुख्य टाकी पुन्हा भरताना आणि रुग्णालयात बॅकअप सुरु करण्यादरम्यानच्या काळात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सूचित होते.

केंद्रीय राज्यमंत्री चार पानांच्या लेखी उत्तरात म्हणाले की, केंद्र सरकारने देशात कोरोना नसलेल्या रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सातत्य राखण्यासाठी पावले उचलली आहेत. ज्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी झाला. १० मे रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यसभेत २० जुलै रोजी जेव्हा दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रस्त्यांवर आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा आरोग्य राज्यमंत्री, भारती प्रवीण पवार यांनी त्यांच्या लेखी उत्तरात म्हटले होते की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे.

पवार यांनी म्हटले होते की, सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मृत्यूच्या अहवालासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूची नोंद करतात. पण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाठवलेल्या अहवालानुसार केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे कोणताही मृत्यू झाला नाही.