कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या संमिश्र लसीसंदर्भात मोठी अपडेट


नवी दिल्ली – भारतीय औषध नियामक मंडळाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर महत्वाचा निर्णय घेतला असून अभ्यासासाठी परवानगी दिली आहे. यासंबंधीचा अभ्यास आणि वैद्यकीय चाचणी वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये केली जाणार आहे. केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ समितीने २९ जुलैला अभ्यास करण्यासाठी शिफारस केली होती.

तज्ज्ञ समितीने बैठकीदरम्यान ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला ३०० निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या संमिश्र लसीची मात्रा देऊन चौथ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींच्या मात्रा देऊ शकतो का? हे पडताळणे या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे.

कोव्हिशिल्ड लशीनंतर उत्तर प्रदेशात १८ व्यक्तींना चुकून कोव्हॅक्सिन लस दिली गेल्यानंतर त्यांचा अभ्यास केला असता एकाच लसीच्या दोन मात्रांपेक्षा दोन लसींच्या मात्रांचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरतो, असा निष्कर्ष ‘आयसीएमआर’ने काढला होता. चुकून दोन वेगवेगळ्या लसींच्या मात्रा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथे १८ व्यक्तींना देण्यात आल्या होत्या. त्यांचा तुलनात्मक अभ्यास एकाच लशीच्या दोन मात्रा दिलेल्या व्यक्तींशी करण्यात आला. संमिश्र लस घेतलेल्यांमध्ये अल्फा, बिटा आणि डेल्टा विषाणूंविरोधात अधिक परिणामकारकता आढळली. शिवाय आयजीजी प्रतिपिंडेही मोठय़ा प्रमाणात दिसून आली. विषाणूला प्रतिकार करणाऱ्या प्रतिपिंडांची संख्याही अधिक आढळली, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अभ्यासात नमूद केले आहे.

‘मेडआरएक्सआयव्ही’ या संकेतस्थळावर ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. ‘अ‍ॅडेनोव्हायरस’च्या मदतीने तयार केलेली लस निष्क्रिय केलेल्या करोना विषाणूचा वापर असलेल्या लसीनंतर देण्यात आल्यामुळे संबंधितांमध्ये चांगले परिणाम दिसले, पण या दोन वेगवेगळ्या लशी ठरवून दिलेल्या नव्हत्या, तर चुकून तसे झाले होते, असे या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारचा संमिश्र लशींचा वापर केवळ सुरक्षितच नाही, तर त्यातून उत्तम प्रतिकारशक्तीही निर्माण होते, असेही या अभ्यासातील निष्कर्ष आहेत. कोव्हिशिल्ड ही लस ‘अ‍ॅडेनोव्हायरस’चा वापर करून तयार करण्यात आली आहे, तर कोव्हॅक्सिनमध्ये व्हिरीयॉन बीबीव्ही १५२ विषाणूचा वापर करण्यात आला आहे.