वर्क फ्रॉम होम करणाऱ्याच्या पगारात कपात

करोना मुळे जगभरातील मोठी संख्या वर्क फ्रॉम होम करत असली तरी या समुदायासाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकन दिग्गज कंपनी गुगलने कायमस्वरूपी घरून काम करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून ही कपात कर्मचारी किती दूरवरून आणि महागड्या शहरात का स्वस्त शहरात राहून काम करतो त्यानुसार कमी जास्त असेल असे समजते.

गुगलने हा निर्णय घेतल्याने अन्य बड्या कंपन्याही गुगलच्या पावलावर पाउल टाकून पगार कपात करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण असा निर्णय घेणारी गुगल ही पहिली कंपनी नाही. फेसबुक, ट्विटर यांनी यापूर्वीच पगार कमी केले आहेत. रेडीट आणि झीमे सारख्या छोट्या कंपन्यांनी सुद्धा या अगोदरच पगार कपात केली आहे.

पगार कपात करण्याची ही प्रथा नवी नाही. पण करोना काळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना पगार कमी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. गुगलने पे कॅलक्यूलेटरचा वापर करून कर्मचारी त्यांचे किती नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊ शकणार असल्याचे सांगितले आहे. एखाद्या शहरात गुगलचे कार्यालय आहे आणि तेथील कर्मचारी घरून काम करणार असतील तर त्यांचे पगार कमी केले जाणार नाहीत. महागड्या शहरात कुणी राहत असेल आणि कामावर येण्यासाठी १ तासापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ही कपात १० टक्के असेल असे समजते.