एटीएम मध्ये कॅश संपली तर बँकाना होणार दंड

अनेक ठिकाणी एटीएम मध्ये कॅश संपलेली असल्याने ग्राहकांना गैरसोय सोसावी लागल्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन रिझर्व बँक ऑफ इंडियाने एटीएम मध्ये १० तासापेक्षा जास्त काळ कॅश संपल्याची परिस्थिती असेल तर संबंधित बँकांना १० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही महिन्यात कोणत्याही एटीएम मध्ये १० तासापेक्षा जास्त वेळ कॅश नसेल तर हा दंड आकाराला जाणार असून त्याची सुरवात १ ऑक्टोबर २०२१ पासून होणार आहे.

या संदर्भात रिझर्व बँकेने एक पत्रक जारी केले आहे. ग्राहकांना हवे असतील तेव्हा एटीएम मधून पैसे काढता आले पाहिजेत आणि त्यांची गैरसोय होता कामा नये असे या पत्रकात म्हटले गेले आहे. नोटा जारी करणे ही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे आणि नोटा,शाखा किंवा एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना वेळेवर देणे ही बँकेची जबाबदारी आहे त्यामुळे एटीएम मध्ये वेळेवर नोटा भरल्या जातात वा नाही याची दक्षता बँकेने घ्यायची आहे असेही या पत्रकात नमूद केले गेले आहे.

त्यामुळे देशात कुठल्याही एटीएम मध्ये कॅश नसेल तर प्रत्येक एटीएम मागे बँकेला १० हजार रुपये दंड होणार आहे. व्हाईट लेबल एटीएम बाबत संबंधित बँकेला हा दंड होणार आहे. व्हाईट लेबल एटीएम, गैरबँका संस्था पाहतात पण त्या एटीएम मध्ये कॅश भरण्याची जबाबदारी बँकांवर असते. देशभरात विविध बँकांची जून २०२१ अखेरी २.१३,७६६ एटीएम्स आहेत.