हा होता जगातील सर्वाधिक उंच माणूस- २२ व्या वर्षीच आला होता मृत्यू

जागतिक विक्रम नोंदविणाऱ्यांच्या विक्रमाच्या नोंदी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये केल्या जातात. या नोंदी नवीन विक्रम झाला की बदलतात. मात्र गेली ८० वर्षे जगातील सर्वाधिक उंच माणसाचे रेकॉर्ड अजूनही अबाधित असून हे रेकॉर्ड रोबर्ट वॉडलो यांच्या नावावर ८० वर्षापूर्वी म्हणजे १९४० मध्ये नोंदले गेलेले आहे.

अमेरिकेच्या एल्टन म्हणजे एलीनोईस शहरात रॉबर्ट २२ फेब्रुवारी १९१८ साली जन्माला आला. त्यांच्या आईवडिलांची उंची सामान्य होती पण जन्मापासून काही दिवसानंतर रॉबर्टची उंची मात्र वाढू लागली. सहा महिन्याचा असताना त्याची उंची ३ फुट, वर्षाचा झाल्यावर ३ फुट ६ इंच, दोन वर्षाचा असताना ४ फुट ६ इंच आणि पाच वर्षाचा असताना ५ फुट ६ इंच होती.

१२ व्या वर्षी रॉबर्ट ७ फुट उंच होता आणि तेव्हाही तो जगातला सर्वात उंच मुलगा होता. १९३६ मध्ये १८ वर्षी पूर्ण झाल्यावर त्याची उंची ८ फुट ४ इंच आणि त्यानंतर ८ फुट ११ इंच झाली होती. त्याच्यासाठी खास ३७ एए साईजचे बूट बनवावे लागत. शरीरातील काही ग्रंथींचे कार्य बरोबर होत नसल्याने त्याची उंची वाढत होती असे सांगतात. पण ही वाढ त्याच्यासाठी घातक ठरली. त्याचे पाय कमजोर झाले आणि नंतर त्याला आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हते.

अखेर वयाच्या २२ व्या वर्षी रॉबर्टला मृत्यू आला. त्याच्यासाठी ४५० किलो वजनाची शवपेटी बनवावी लागली आणि ती उचलण्यासाठी १२ माणसे लागली असे सांगतात. आजही एलिनोईस शहरात रॉबर्टचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो.