मेस्सीने धरला फ्रांसच्या पीएसजी क्लबचा हात

बार्सिलोना क्लब बरोबरचे २१ वर्षांचे नाते संपल्यावर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने फ्रांसच्या पॅरीस सेंट जर्मेन क्लबबरोबर करार केला असून मंगळवारी मेस्सी फ्रांस मध्ये दाखल झाला. हा करार सुरवातीला दोन वर्षासाठी असून त्यात एक वर्ष मुदतवाढ होऊ शकणार आहे. या करारानुसार मेस्सीला वर्षाला साडेतीन कोटी डॉलर्स मिळणार आहेत. फ्रांस मध्ये मेस्सीचे जोरदार स्वागत केले गेले.

पॅरीस सेंट जर्मेन क्लबने या संदर्भात एक व्हिडीओ टीझर जारी केला असून त्यात ‘न्यू डायमंड इन पॅरीस’ असा मेस्सीचा उल्लेख केला आहे. फ्रांस मिडियाने कराराची सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यास मेस्सी शनिवारीच क्लबच्या स्थानिक मैदानावर डेब्यू करू शकेल असे म्हटले आहे. स्काय स्पोर्ट्सच्या बातमीमध्ये मेस्सीने गेल्या आठवड्यात बर्सिलोनाशी नाते संपविल्यावर त्याच्याकडे दोन पर्याय होते पण त्याने पीएसजीची निवड केली असे म्हटले आहे. या क्लबबरोबर आल्याने मेस्सी त्याचा जुना साथीदार नेमार याच्या बरोबर पुन्हा खेळू शकणार आहे. नेमारच्या साथीने खेळताना मेस्सीने बार्सिलोना क्लबसाठी दोन लीगा खिताब, ३ कोप्पा डेल रे व चँपियनशिप अश्या स्पर्धा जिंकल्या आहेत.