मारबर्ग व्हायरसने वाढवली जगाची चिंता, कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य; WHO ने दिला इशारा


नवी दिल्ली – एकीकडे जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच दुसरीकडे आता जगासमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. घातक अशा मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये आढळून आला आहे. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने दिली आहे. इबोला आणि कोरोनापेक्षाही अधिक घातक हा विषाणू असल्याचे मानले जात आहे. प्राण्यांमधून या विषाणूचा संसर्ग मानवामध्ये होऊ शकतो. मारबर्गचा रुग्ण आढळून आल्यामुळे गिनीमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मरण पावण्याचे प्रमाण हे ८८ टक्के एवढे आहे. २ ऑगस्ट रोजी या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे दक्षिण गुएकेडॉ प्रांतामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यनंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात हा विषाणू आढळून आला. शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीच्या शरीरात इबोलाचा विषाणू आढळून आला नसल्याचा उल्लेख आहे. इबोलाऐवजी या व्यक्तीच्या शरीरात मारबर्ग विषाणू आढळून आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

यासंदर्भातील माहिती आफ्रीकेमधील जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय निर्देशक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी दिली आहे. मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मोएती म्हणाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दोन महिन्यांपूर्वीच गिनीमधून इबोलाचे समूळ उच्चाटन झाल्याची घोषणा केली होती. पण आता मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचे वृत्त समोर आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. कोरोनासोबतच मागील वर्षी येथे इबोलाचीही साथ पसरली होती. या साथीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने येथे विशेष मोहीम राबवली होती. मारबर्ग विषाणूच्या संसर्गाचा धोका क्षेत्रीय स्तरावर अधिक असून जागतिक स्तरासंदर्भात धोका कमी असला तरी खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आम्ही काम करत असून इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्षात फिल्डवर उतरुन काम केले आहे, त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांचा फायदा होईल. तसेच तज्ज्ञांची आम्ही मदत घेत असून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मोएती म्हणाले आहेत. गिनी सरकारनेही यासंदर्भात एक पत्रक काढून मारबर्गचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मारबर्गचा संसर्ग झाल्यानंतर शरीरामधून उत्सर्जित होणारे पदार्थ हे बाहेरील प्रदुषित वातावरण आणि इतर गोष्टींच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे रुग्णाची प्रकृती अजून खालावते. तसेच यामुळे रुग्णावर योग्य पद्धतीने उपचारही करता येत नाहीत.