आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन


पुणे – आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी बालाजी तांबे यांनी मोठे कार्य केले आहे. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती.

त्यांनी लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला.

अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.