नव्या लोगोसह येणार महिन्द्राची एक्सयुव्ही ७००

वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्र अँड महिंद्रने सोमवारी त्यांच्या भारतीय पोर्टफ़ोलिओ मध्ये सर्व एसयूव्ही साठी नवा लोगो सादर केला असून आगामी एक्सयुव्ही ७०० सर्वप्रथम या लोगोसह येणारी कंपनीची एसयुव्ही असल्याचे म्हटले आहे. देशात आपल्या एसयुव्ही साठी नवी ओळख या रुपात हा लोगो, ब्रांड स्टेटमेंट ‘एक्सप्लोरर द इंम्पोसिबल’चे प्रतिक आहे आणि नवीन आव्हानांचा सामना करण्याची क्षमता दाखविणारा आहे. २०२२ पर्यंत देशातील ८२३ शहरे आणि १३०० विक्री सर्व्हिस टचपॉइंटवर हा लोगो पाहता येणार आहे.

महिंद्रच्या आगामी एक्सयुव्ही मध्ये अनेक फिचर्स प्रथमच या सेगमेंट मध्ये दिली गेली आहेत. १५ ऑगस्ट रोजी ही एक्सयुव्ही लाँच होत आहे आणि २ ऑक्टोबर पासून त्याची विक्री सुरु होईल असे समजते. ही सात आसनी गाडी आकाराने मोठी आहे. तिला अॅडव्हांस ड्राईव्हर असिस्टंट सिस्टीम, अॅडाप्टीव्ह क्रुझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटोनॉमस ब्रेकिंग व लेन कीप असिस्टंट अशी फिचर्स प्रथमच दिली आहेत. वायरस सुरक्षेसाठी एअर प्युरीफायर, स्मार्ट डोर हँडल, ऑटो बूस्ट हेडलँप, पर्सनलाइज्ड सेफ्टी अॅलर्ट सिस्टीम आणि मोठे पॅनॉरेमिक सन रुफ दिले गेले आहे.