ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधानांच्या मेजवानीत पाणीपुरी, चुरमाचे आश्वासन

भारतासाठी पहिले वहिले मैदानी खेळातील सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राचे स्वागत करताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचे खूप कौतुक केलेच पण ‘ तुला गोलगप्पे (पाणीपुरी), चुर्मा, सिंधूला आईस्क्रीम देऊ शकलो नव्हतो पण १५ ऑगस्टच्या पंतप्रधानांच्या मेजवानीत हे पदार्थ नक्की देऊ शकतो असे सांगितले. सोमवारी टोक्यो ऑलिम्पिक जिंकून भारतीय खेळाडूंचे पथक दिल्लीत दाखल झाले. त्याच्या स्वागताची जोरदार तयारी केली गेली होतीच पण त्याच्या स्वागतासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह माजी क्रीडामंत्री किरेन रीजीजू जातीने विमानतळावर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक साठी गेलेल्या सर्व खेळाडूंना मेजवानी साठी आमंत्रित केले असून ते या सर्व खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. क्रीडामंत्री ठाकूर म्हणाले, टोक्यो ऑलिम्पिक २०२० अनेक कारणांनी भारतासाठी विशेष आहे. या स्पर्धेत भारतातचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे म्हणजे १२८ खेळाडूंचे पथक गेले होते. या स्पर्धेत भारताने सात पदके जिंकून नवा अध्याय सुरु केला आहे आणि आपल्या यशाने नवीन भारत जगावर क्रीडा क्षेत्रात सुद्धा भारी होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. टीम इंडियाने मैदानी खेळात प्रथमच सुवर्णपदक कमावले आहे, सिंधूने सलग दुसरे ऑलिम्पिक मेडल मिळविले आहे. पुरुष हॉकी टीमने ४१ वर्षानंतर पुन्हा मेडल वर आपला दावा केला आहे. महिला हॉकी टीमने सर्वश्रेष्ठ चौथे स्थान मिळविले आहे. गोल्फर अदिती हिने ही चौथे स्थान मिळविले आहे.

मीराबाई चानूने रजत पदकाने सुरवात केली आणि नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेची सांगता केली असेही ठाकूर म्हणाले.