भारतात लवकरच १२-१८ वयोगटातील मुलांसाठी झायडस-कॅडिला लसीला परवानगी मिळण्याची शक्यता


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला या आठवड्यात आपातकालीन वापराची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. १ जुलै रोजी झायडस कॅडिला यांनी आपल्या ZyCoV-D या लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळावी, म्हणून केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. भारतात कंपनीने १२-१८ वयोगटातील मुलांसाठी सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी घेतली आहे. सरकारकडून या लसीला परवानगी मिळाल्यास ZyCoV-D ही मुलांसाठीची भारतातील पहिली लस असेल. ZyCoV-D या लसीचे तीन डोस दिले जातात. ही इंट्राडर्मल लस असून सुई न वापरता ट्रॉपिस वापरून दिली जाते. यामुळे लस टोचल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतील.

भारत सरकारने आतापर्यंत ५ कोरोना प्रतिबंधित लसींना परवानगी दिली आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्हि, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या सिंगल डोसचा समावेश आहे. भारतात काही दिवसांपूर्वीच ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस १८ वर्षांवरील नागरिकांना दिली जाऊ शकते.

डेल्टासह, कोरोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून ही लस संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे. सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ५ ऑगस्टला एक मात्रा लशीला आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लसीचे देखील संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. मिश्र लसीच्या शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसल्यास कोरोना लसीकरण मोहीमेला वेग मिळणार आहे.

कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.