ऑलिम्पिकवीरांची आज होणार घरवापसी, पदक विजेत्यांचा होणार सन्मान


नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारे भारतीय ऑलिम्पिकवीर आज मायदेशी परतणार आहेत. पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचा आज दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान केला जाणार आहे. आधी हा सत्कार समारंभ मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअममध्ये होणार होता, पण खराब वातावरणामुळे हा समारंभ अशोका हॉटेलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन संबोधित करणार असल्याची देखील माहिती आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट्स अथॉरिटी आफ इंडियाने (SAI) केले. आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वाधिक सात पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदक जिंकली आहेत. आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह काही माजी खेळाडू आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काल रविवारी टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी 205 देशांतील हजारो खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि पदके जिंकण्याचा प्रयत्न केला. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पुढील ऑलिम्पिक होणार आहे.