पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माजी विद्यार्थ्यांकडून पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम रानडे इन्स्टिट्यूटमधुन हलवण्यास विरोध


पुणे : डेक्कनमधील रानडे इन्स्टिट्यूटमधुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारितेचे शिक्षण देणारा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग चालवला जातो. पण सिनेटसमोर रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारीतेचा पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा कोर्स हलवुन तो विद्यापीठाच्या आतमधील डिपार्टमेंट ऑफ मिडीया एन्ड मास कम्युनिकेशन स्टडीजमध्ये नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण रानडे इन्स्टिट्यूटमध्येच पत्रकारितेचा मराठी आणि इंग्रजी डिप्लोमा सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र पदव्युत्तर पदवीचा कोर्स रानडे इन्स्टिट्यूटमधुन हलवून हळुहळू रानडे इन्स्टिट्यूट मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप पत्रकारांकडून आणि माजी विद्यार्थ्याकडून होत आहे.

आज त्यासाठी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर यांना भेटून हा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या शेकडो कोटी रुपये किमतीच्या जागेवर डोळा ठेऊन पत्रकारितेचा कोर्स हटवण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.

या माजी विद्यार्थ्यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हटवण्याचा निर्णय मागे न घेतला गेल्यास विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर नितीन कळमळकर यांनी या विषयाची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा तसेच पंधरा दिवसांमध्ये या समितीच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेण्याच आश्वासन दिले आहे.

पत्रकारितेचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम रानडे इन्स्टिट्यूटमधुन हटवण्यास पुण्यातील पत्रकारांची संघटना असलेल्या पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही विरोध करण्यात आला आहे. पत्रकार संघदेखील याबाबत आपला विरोध विद्यापीठाकडे नोंदवणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर यांनी म्हटले आहे.

रानडे इन्स्टिट्यूटमधुन पदव्युत्तर अभ्यासक्रम हलवण्यात येणार असला तरी एका वर्षाच्या कालावधीत पुर्ण करावे लागणारे मराठी डिप्लोमा, इंग्रजी डिप्लोमा आणि फोटो जर्नलीझमचे कोर्स रानडे इन्स्टिट्यूटमधेच राहणार असल्यामुळे रानडे इन्स्टिट्यूट बंद होणार असल्याच्या अफवांना बळी पडू नये, असेही विद्यापीठाच्या सिनेट प्रतिनिधींचे म्हणने आहे.

तर रानडे इन्स्टिट्यूटमधुन पदवी अभ्यासक्रम हटवण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते रानडे इन्स्टिट्यूट डेक्कन मधील मोक्याच्या ठिकाणी आहे आणि या जागेची किंमत चारशे कोटींच्या घरात आहे. या मोक्याच्या जागेवर डोळा ठेवून रानडे इन्स्टिट्यूटमधुन एक एक कोर्स विद्यापीठाच्या कॅंपसमध्ये हलवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चालवल्या जाणाऱ्या कोर्सेसपैकी फक्त पत्रकारितेचे शिक्षण देणारा हा कोर्सच विद्यापीठ आवाराच्या बाहेर चालवला जातो. रानडेची ही ओळख कायम रहावी अशी माजी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.