बार्सिलोना क्लब निरोप समारंभ, मेस्सीला अनावर झाले अश्रू

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि बार्सिलोना क्लबचा आधारस्तंभ लियोनेल मेस्सी क्लबने आयोजित केलेल्या निरोप समारंभात एकदम भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. बार्सिलोन क्लब बरोबरची १७ वर्षांची सक्रीय साथ आणि त्यापूर्वी ४ वर्षाचे प्रशिक्षण असे २१ वर्षाचे नाते संपुष्टात आल्याने मेस्सी गहिवरून गेला. निरोप समारंभात बोलताना त्याला अश्रू आवरेनात. इतक्या वर्षांची साथ सुटल्याचे वेदना त्याच्या डोळ्यावाटे पाझरत होती.

मेस्सी म्हणाला, जवळजवळ आयुष्यातला आत्तापर्यंतचा काळ येथेच गेला. टिम सोडणे मला फार अवघड होते. मी तयार नव्हतो. क्लब बरोबर आपण कायम राहू असा विश्वास वाटत होता. हे माझे घरच आहे. क्लब सोडावा लागल्याने फार निराश झालो आहे. स्पॅॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे क्लब बरोबर पुन्हा करार करणे असंभव झाले आहे.

बार्सिलोना क्लब बरोबर मेस्सीने यशाची अनेक शिखरे आणि अनेक स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय खिताब मिळविले. २००४ पासून मेस्सी या क्लब बरोबर खेळत आहे. ७७८ सामने या क्लबतर्फे खेळून त्याने रेकॉर्ड नोंदविले आहे आणि ६७२ गोल केले आहेत. बार्सिलोनाचा तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.