१६१७ दिवसांच्या खडतर प्रशिक्षणाचे फलित आहे नीरजचे गोल्डमेडल

भालाफेकीत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी करणारया नीरज चोप्राची त्यासाठीची कडक मेहनत आता चर्चेत आली आहे. एका आकडेवारी नुसार भारतीय तिरंग्याची शान वाढविण्यासाठी या गोल्डन बॉयने अतिशय खडतर असे १६१७ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. इंडियन आर्मी मध्ये सुभेदार पदावर असणाऱ्या २३ वर्षीय नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्णपदकाची कमाई करताना भारताचे धावपटू मिल्खासिंग यांच्या स्वप्नाची पूर्ती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात नीरजने १६१७ दिवसांचे खडतर प्रशिक्षण घेतले असून त्यात विदेशात घेतलेल्या ४५० दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. युरोप मध्ये ट्रेनिंग साठी त्याला १७७ भाले उपलब्ध करून दिले गेले आणि त्याच्या एकूण प्रशिक्षणासाठी सरकारने ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या गरजेनुसार त्याला परदेश कोच डॉ. क्लाऊस दिले गेले आणि खासगी फिजीओथेरपिस्ट सुद्धा नेमला गेला होता.

केंद्र सरकारने प्रशिक्षण व स्पर्धा संदर्भात वार्षिक कॅलेंडर व टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम योजनेत नीरजचा समावेश केला होता आणि त्याला फंड्सची कमतरता भासू दिली नव्हती. परदेशाशिवाय त्याने ११६७ दिवस पतियाळाच्या एनआयएस मध्ये प्रशिक्षण घेतले. १७७ भाले आणि भलाफेक मशीन सुद्धा त्याच्यासाठी खरेदी केले गेले आणि त्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च आला. नीरजच्या सुवर्णपदकाने हे सारे खर्च आणि कष्ट भरून पावल्याची भावना व्यक्त होते आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारने खेळाडूंवर केलेला खर्च गुंतवणूक म्हणून मानला आहे आणि टोक्यो मध्ये त्याचा चांगला परतावा मिळाला आहे. केंद्र सरकार ग्रास रूट खेळाडूसाठी विशेष काम करत असून त्यासाठी खेलो इंडिया सारख्या अनेक योजना राबवून आवश्यक ती पावले टाकत आहे.