देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केले नीरज चोप्राचे मराठा कनेक्शन

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये अॅथलेटिक्स खेळाडू नीरज चोप्राने देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आणि देशवासियांच्या हृदयावर विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करून नीरजच्या पूर्वजांचा इतिहास सांगितला असून त्यातून त्याचे मराठा कनेक्शन उलगडून दाखविले आहे.

फडणवीस यांच्या कवितेनुसार नीरजचे पूर्वज मराठा आहेत आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी ते संबंधित आहेत. महाराष्ट्रात बाळाजी बाजीराव त्यावेळी सत्तेत होते. बाळाजी बाजीराव यांची तलवार इतिहासात नेहमी चर्चेची बाब राहिली आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात हीच तलवार आणण्यासाठी निरजचे पूर्वज मराठा साम्राज्यातून हरियाणात पानिपत येथे गेले आणि नंतर तेथेच स्थायिक झाले.

नीरज प्रत्यक्षात युध्द लढला नसेल पण त्याने भाल्याच्या जीवावर जग जिंकले आहे असे म्हणून फडणवीस यांनी इतिहासासंदर्भातली ही कविता ट्विटरवर शेअर केली आहे.