सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव


नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचे हे पहिले सुवर्ण पदक आहे.

देशाचे नाव टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणे आवश्यक असते. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादही सोबत असतात. यात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

हरियाणा सरकारने नीरज चोप्राला 6 कोटी रुपयांसह क्लास वन अधिकारी पदावर सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नीरज चोप्राला पंजाब सरकारकडून देखील दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोबतच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नीरजचे कौतुक करत एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईने देखील एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला नवीन लॉन्च होत असलेली एसयूवी 700 गिफ्ट करणार असल्याचे म्हटले आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हे दुसरे वैयक्तिक सुवर्ण पदक आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदके जिंकली आहेत.