मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन


मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे. भालाफेकीसाठी नीरजच्या मन आणि मनगटात विश्वासाची, समर्थ साथ यांची ताकद भारणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसह, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रा याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

दरम्यान टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतील ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मने जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीने ऑलिंपिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे. देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. नीरज चोप्राचे मन:पूर्वक अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, नीरज चोप्राने भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकाने पदकतालिकेतच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे. नीरज चोप्राचे सुवर्णपदक मैदानीखेळांकडे पाहण्याचा देशवासियांचा दृष्टीकोन बदलेल. मैदानी खेळांना लोकप्रियता, वलय मिळवून देईल. भारतीय युवकांना मैदानी खेळांकडे वळण्यासाठी प्रवृत्त करेल. नीरज चौप्राचे सुवर्णपदक त्याच्या सातत्यपूर्ण, कठोर मेहनतीचे यश आहे. नीरज चोप्राचे, त्याच्या सहकाऱ्यांचे, प्रशिक्षक, मार्गदर्शक, चाहत्यांचेही सुवर्णपदकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नीरज चौप्राच्या सुवर्ण कामगिरीचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.