आषाढ अमावस्येला प्राप्त झाले आहे एखाद्या उत्सवाप्रमाणे स्वरुप


मुंबई – उदया राज्यात आषाढी अमावस्या म्हणजेच गटारी साजरी होणार आहे. एखाद्या उत्सवाप्रमाणे या अमावस्येला स्वरुप प्राप्त झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. तसेच आषाढी अमावस्या म्हटले तर कुणाच्या लक्षात येणार नाही पण गटारी अमावस्या म्हटले तर लगेच सगळ्यांची ट्यूबलाईट पेटते. गटारी अमावस्याच्या दिवशी एखाद्या सणाप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

अनेक लोक मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे श्रावण महिन्यात सेवन करत नाहीत. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्याअगोदरचा दिवस म्हणजेच गटारीच्या दिवशी मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारत मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. तुम्ही गटारी अमावस्येला दारू पिणं आणि मांस-मच्छी खाणा-यांना पाहिले असेलच. पण गटारी म्हणजेच आषाढ अमावस्येला एक वेगळ महत्व देखील आहे.

आषाढ महिन्यात पाऊसही सुरुच असतो. पावसामुळे रोगराई निर्माण होते आणि ती दूर व्हावी यासाठी लोक ग्रामदेवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. आपल्या मागे लागलेल्या सर्व पीडा, त्रास दूर व्हावेत यासाठी विविध विधी केल्या जातात. तसेच घरातील पीडा जाऊन प्रकाश निर्माण व्हावा म्हणून अमावस्येच्या दिवशी घरामध्ये संध्याकाळी दिव्यांचे पूजन करतात.

दिव्यांची अमावस्या म्हणूनही आषाढ अमावस्या हा दिवस साजरा केला जातो. घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करुन या दिवशी त्यांना पाटांवर मांडून त्यासमोर रांगोळी काढली जाते. सर्व दिवे ओळईने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुले वाहायची त्यानंतर गंध, फुलांनी पूजा केली जाते. मग नैवेद्य दाखविले जातात. पण सध्याच्या काळात आषाढ अमावस्येला गटारी असे संबोधले जाते. या दिवशी दारू पिणे, मांस-मच्छी खाणे, गाण्यांवर धांगडधिंगा करणे असे प्रकार सर्रास पहायला मिळतात. या प्रकारांमुळेच आषाढ अमावस्येला चुकीच्या नजरेने पाहिले जाते.

Leave a Comment