शिवपूजा करताना या वस्तूंचा वापर नकोच


सनातन हिंदू धर्मात कोट्यावधी देवता आहेत आणि त्या प्रत्येकाचे पूजा विधी विविध प्रकारचे आहेत. या देवांना काही वस्तू प्रिय मानल्या जातात तर काही त्याची पूजा करताना वर्ज्य मानल्या जातात. आता श्रावण मास सुरु होत आहे. या महिन्यात शिवपूजेचे विशेष महत्व आहे. शिव पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तरच ती पूजा सफल होते.

शिवपूजनात तुळस वापरली जात नाही. इतकेच काय पण शिवपूजेसाठी बनविलेल्या पंचामृतात सुद्धा तुळस पान घातले जात नाही. तुळस ही विष्णूला प्रिय आहे म्हणून विष्णू पूजेत ती आवर्जून वापरली जाते. तसेच आपण सर्वसाधारण कोणत्याही देवाची पूजा करताना नारळ वापरतो पण शिवपूजेत नारळ अथवा नारळ पाणी वापरले जात नाही. नारळ लक्ष्मी पूजेसाठी वापरला जातो आणि लक्ष्मी विष्णू पत्नी आहे.

देवता पूजेत कुंकू वाहिले जाते. शिवपूजेत मात्र कुंकू शिवलिंगाला वाहू नये तर भस्म अथवा चंदन वापरावे. पार्वती पूजेत कुंकू वापरले तर चालते. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक आहे. तसेच शिवपूजेत हळद सुद्धा वापरली जात नाही. भगवान विष्णू हे गृहस्थी जीवनाचे कर्ते मानले गेले आहेत तर शिव बैरागी आहेत. हळद सौदर्यवाढीसाठी उपयुक्त आहे त्यामुळे शिव पूजेत त्याऐवजी पांढरे अथवा लाल चंदन वापरले जाते.

शिवाला पांढरे फुल प्रिय आहे. पण पांढरा कवठी चाफा त्याला वाहिला जात नाही. याच्या मागे एक कथा आहे. पूर्वी झाडे, फुले माणसाप्रमाणे बोलू शकत. तेव्हा कवठी चाफा खोटे बोलला म्हणून शिवाने त्याला पूजेतून बहिष्कृत केले तेव्हापासून शिवाला हा चाफा वाहिला जात नाही.

Leave a Comment