खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो क्रिस व्हॅन


चित्रपट, कॉमिक्स मधून अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी, दुष्ट माणसांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सुपरहिरो येतात असे नेहमीच दिसते. पण प्रत्यक्षात सुपरहिरो खरे असतात का असा प्रश्न पडतो. मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी एक खरा सुपरहिरो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात कार्यरत असून तो नेहमी बॅटमॅनच्या वेशात या मुक्या जीवांच्या मदतीसाठी तत्परतेने येतो. २७ वर्षीय क्रिस व्हॅन या मुक्या प्राण्यांची केवळ मदत करत नाही तर त्यांचे मालक शोधून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवितो. दुसऱ्या लोकांनीही या कामी मदत करावी, त्यांना त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून तो मुद्दाम बॅटमॅनचा पोशाख करतो.


क्रिसला मुक्या प्राण्यांची मदत करा हा संदेश जगभरातील लोकांना द्यायचा आहे. काही वर्षापूर्वी तो प्राण्यांना मदत करणाऱ्या एका संस्थेत मदतनीस होता. नंतर त्याने २०१८ मध्ये प्राण्यांना समर्पित एनजीओ बॅटमॅन फॉर पॉज स्थापन केली आणि त्याद्वारे तो मुक्या प्राण्यांची मदत करत आहे. अनेकदा हे प्राणी त्यांच्या मालकांपासून भरकटतात. क्रिस त्यांना त्यांचे मालक शोधून घरी पोहोचवितो. मालक सापडला नाही तर त्या प्राण्याची देखभाल काळजीपूर्वक करेल अश्या माणसांच्या हाती देतो. त्याचे हे काम त्याच्या घराच्या ५०० मैल परिसरात चालते. प्राणी पोहोचविण्यासाठी तो त्याच्या होंडा अकोर्ड कारचा वापर करतो. पण त्याला या कामासाठी मोठे वाहन हवे आहे आणि त्यासाठी तो क्राउडफंडिंग करतो आहे.


क्रिस सांगतो ईमेल, फोनवरून माझ्याकडे अमुक प्राणी संकटात आहे त्याला वाचवा असे मेसेज येतात. मी त्वरित या प्राण्यांच्या मदतीला जातो. प्राण्यांचे मूळ मालक शोधण्याचे काम शनिवार रविवार करतो आणि सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवसात या प्राण्यांना त्याच्या घरी नेण्याचे काम करतो. त्यामुळे मुक्या जीवांसाठी हा देवदूत बनला आहे.

Leave a Comment