दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर अशा प्रकारे ट्रान्सफर कराल आपले रेशनकार्ड


मुंबई – आपल्या देशामध्ये रेशन कार्ड हे एक महत्त्वाच्या दस्तावेजापैकी एक एक आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍या नागरिकांना राज्य सरकार, केंद्र सरकार कडून रेशन कार्डवर कधी मोफत तर माफक दरात अन्न धान्य पुरवले जाते. राज्य सरकारकडून प्रत्येक ठिकाणी ते जारी केले जाते. दारिद्र रेषेखाली असलेल्या नागरिकांना सरकारने कोरोना संकट काळात अन्न धान्य पुरवल्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची देखील घोषणा केली. सध्या देशात 3 प्रकारची रेशन कार्ड उपलब्ध आहे. आर्थिक स्तरानुसार ती वेगवेगळी आहेत. पण तुम्ही रेशन कार्डचा वापर करत असाल आणि बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला रहायचे ठिकाण, राज्य बदलावे लागत असेल तर रेशन कार्ड कसे बदलायचे? हा प्रश्न आपल्यापैकी अनेक मनात निर्माण होत असतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला रेशनकार्ड ट्रान्सफर कसे करायचे याची माहिती देणार आहोत.

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. ते तुम्हाला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेल्यावर ट्रान्सफर करायचे असल्यास तुमच्या जवळच्या रेशन कार्ड संबंधित कार्यालयात जावे लागेल. बदल करून घेण्यासाठी एक अर्ज दाखल करावा लागेल. तसेच रहिवासी पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. या बदलासाठी तुम्हाला काही शुल्क कार्यालयामध्ये भरावे लागणार आहे.

रेशन कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • सरकार / सार्वजनिक सेक्टरमधील उपक्रमांद्वारे जारी ओळखपत्र जे पत्त्यासाठी ग्राह्य मानले जाते.
  • टेलिफोन बिल
  • एलपीजी गॅस पावती
  • ड्राइव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • मतदान ओळखपत्र
  • स्वतःचे घर असल्यास टॅक्स पावती
  • भाड्याचे घर असेल तर भाडे दिलेली पावती. पावतीवर घराच्या मालकाचे नाव व पूर्ण पत्ता असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच तुमच्या सोबत 3 पासपोर्ट साईज फोटो सोबत असणे आवश्यक आहे.

जुने रेशन कार्ड जमा केल्यानंतरच तुम्ही नवीन कार्डसाठी अर्ज करू शकाल. नव्या BPL रेशन कार्डसाठी 5 रूपये, APL साठी 10 रूपये तर कम्युटरराईज्ड कार्डसाठी 45 रूपये फी घेतली जाईल. वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत आता केंद्र सरकारच्या सवलती सर्वत्र समान मिळणार आहेत.