मुंबई दौऱ्यावर येणार राहुल गांधी; शिवतीर्थावर घेणार सभा


मुंबई : काँग्रेसचे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी डिंसेबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. शिवसेना आणि मनसेने येथे आतापर्यंत कायमच सभा घेतल्या आहेत. पण आता पक्षाचे पुर्नरुजीवन करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपले अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसही शिवतीर्थावर सभा घेणार असल्यामुळे आता यावर शिवसेना आणि मनसे यांची काय भूमिका असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवेसना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, राहुल गांधी लवकरच मुंबईत भेटीसाठी येतील. तसेच ते मुंबईतील राजकीय परिस्थितीसोबतच त्यांच्या पक्षाचाही आढावा घेतील, असे सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवसाचे औचित्य साधत राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केवळ राहुल गांधीच नाही, तर सोनिया गांधीही मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे.

28 डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अद्याप त्यांचा हा दौरा कसा असेल आणि किती दिवसांचा असेल, याबाबात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुंबई दौऱ्यावर राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अशातच काल काँग्रेसच्या गोटात एक महत्त्वाची बैठक पार पडली. याबाबत बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले की, आम्ही या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतच्या रणनितीबाबत चर्चा केली आहे. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी कुणासोबत करायची? याबाबत अद्याप निश्चितता झालेली नाही. यासंदर्भात आणखी काही बैठका होतील आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.