रो रिव्हर- जगातील सर्वात चिमुकली नदी

पाणी म्हणजे जीवन आणि पाणी देणाऱ्या नद्या आपल्या माता, अशी भावना भारतातच नाही तर जगातील अनेक देशात आहे. नदी मग ती मोठी असो, छोटी असो तिच्याविषयी एक जिव्हाळा प्रत्येक माणसाच्या मनात असतो. जगातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून नाईल नदी ओळखली जाते. आपण जास्त लांबीच्या नद्यांची माहिती बरेचदा घेतो पण छोट्या नद्यांची माहिती फारशी घेत नाही. जगातील सर्वात छोटी नदी अमेरिकेत मोंटाना येथे आहे. सर्वात छोटी नदी अशी या नदीची नोंद गिनीज बुक मध्ये झाली असून या नदीचे नाव आहे ‘रो रिव्हर’

ही नदी छोटी म्हणजे फक्त २०१ फुट किंवा ६१ मीटर लांबीची आहे. म्हणजे मोठ्या शहरातील एखाद्या प्रचंड मॉल इतकी. एका ओळीत जेमतेम चार किंवा पाच घरे येतील इतकी हिची लांबी. ही नदी ६ ते ८ फुट खोल आहे. या नदीची माहिती सर्वप्रथम पाचवी पर्यंतच्या वर्गाना शिकविणाऱ्या सुसी नार्दीगर या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली. ती १९८७ साली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी अमेरिकन बोर्डाकडे या नदीची नोंद सर्वात छोटी नदी म्हणून घ्यावी यासाठी याचिका दाखल केली. त्यानीच या नदीला रो रिव्हर असे नाव दिले.

नंतर एनएफएलचा फुटबॉल खेळाडू बनलेल्या या विद्यार्थ्यातील डलास नील याने टीव्ही शो मध्ये या नदीची माहिती दिली. त्यापूर्वी ओरेगॉन मधून वाहणारी डी रिव्हर सर्वात छोटी नदी होती. ही नदी १३० मीटर लांब आहे. या नदीनंतर सुद्धा अनेक नद्यांची नावे लहान नदी म्हणून पुढे आली पण गिनीज बुक मध्ये त्यांना मान्यता मिळाली नाही.

रो रीव्हारचा मोठा आकार, रुंदी व खोली पाहून तिला मात्र सर्वात लहान नदी अशी मान्यता मिळाली. ही नदी मिसुरी नदीला मिळण्यापूर्वी तिला समांतर वाहते. ती चुनखडीच्या खडकांखालून वाहते व त्यातूनही बाहेर पडते. उन्हाळ्यात तिचे पाणी गार तर हिवाळ्यात उबदार असते असेही सांगतात.

भारतात सर्वात छोटी नदी म्हणून राजस्थान मधून वाहणारया अरवारी नदीची नोंद आहे. ही नदी ९० किमी लांबीची आहे.