दहशतवाद्यांना एके ४७ ऐवजी चीनी पिस्तुलाचा पुरवठा

जम्मू काश्मीर भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सिमेपलीकडून आता एके ४७ ऐवजी चीनी पिस्तुलाचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या संघटनांनी त्यांच्या रणनीती मध्ये हा बदल केला असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी प्रामुख्याने एके ४७ रायफल्सचा वापर दहशतवादी सर्रास करत होते मात्र आता चीनी पिस्तुलाचा वापर वाढला आहे. फक्त जम्मू विभागात गेल्या काही दिवसात पोलीस, सेना आणि बीएसएफने ड्रोन मधून फेकलेली १६ चीनी पिस्तुले जप्त केली आहेत तर पकडण्यात आलेल्या संशयितांकडून अशी २० पिस्तुले मिळाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात सीमा भागात संशयित ड्रोन आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. चीनी पिस्तुले एके ४७ च्या तुलनेत वजनाला खुपच हलकी आणि लांबीला कमी आहेत. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून अशी पिस्तुले पाठविणे अधिक सहज आणि सोपे बनले आहे. सीमापार येणाऱ्या ड्रोन मधून अशी पिस्तुले येत आहेत. या पिस्तुलातील बहुतेक पिस्तुले चीनी आहेत तर काही पाकिस्तानी आहेत असेही समजते.

एके ४७ चे वजन साधारण ४ किलो आणि लांबी पावणेतीन फुट आहे तर चीनी पिस्तुले साधारण १ किलो वजन आणि ५ ते ९ इंच लांबीची आहेत. ड्रोनच्या माध्यमातून १० किलो पर्यंत वजन पाठविता येते. त्यामुळे अशी शस्त्रे पुरविणाऱ्या संघटना दहशतवाद्यांच्या दारात काडतुसांसह अशी पिस्तुले पाठवू शकत आहेत. ही शस्त्रे कुठेही नेणे, लपवून ठेवणे सोपे जाते. किश्तवाड मध्ये बीजेपी नेत्याची हत्या याच प्रकारच्या पिस्तुल मधून केली गेल्याचे सांगितले जात आहे. रामबन हल्ल्यात सुद्धा याच पिस्तुलाचा वापर झाला होता असेही समजते.