अमेरिकेत १ लाख ग्रीन कार्ड बेकार ठरण्याची पाळी

अमेरिकेत रोजगार आधारित सुमारे १ लाख ग्रीन कार्ड्स बेकार होण्याचा धोका निर्माण झाला असून येत्या दोन महिन्यात ही कार्ड्स जारी झाली नाहीत तर ही कार्ड्स निरुपयोगी ठरणार आहेत. ही कार्ड्स जारी करण्यासाठी उशीर होत असल्याने भारतीय आयटी क्षेत्रातील कर्मचारी अतिशय नाराज झाले आहेत. आज अनेक वर्षे हे कर्मचारी ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्या आशा धुळीला मिळतील अशी लक्षणे दिसत आहेत.

अमेरिकेत कायदेशीर स्थायी निवासासाठी ग्रीन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे या कार्डला स्थायी निवास कार्ड असेही म्हटले जाते. या वर्षी अप्रवासी नागरिकांसाठी रोजगार आश्वासन कोटा २,६१,५०० इतका आहे. दरवर्षी हा कोटा १,४० लाख असतो. पण दुर्भाग्य असे की हे विसा ३० सप्टेंबर पर्यंत जारी झाले नाहीत तर ते कायमचे निरुपयोगी ठरणार आहेत.

अमेरिकन सिटीझनशिप आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसचे काम अति संथ गतीने सुरु असल्याने हे विसा वेळेत मिळतील याची शक्यता दुरावत चालली आहे. या शक्यतेला विदेश मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. व्हाईट हाउस कडे या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या १२५ भारतीय आणि चीनी नागरिकांनी या संदर्भात कोर्टात धाव घेतली असल्याचे समजते.