महिला हॉकीपटू सलीमाच्या घराचे फोटो वेगाने व्हायरल

ब्राँझ पदकासाठी लढत दिलेल्या महिला हॉकी संघातील झारखंडची खेळाडू सलीमा टेटे हिच्या चंद्र मौळी घराचे फोटो एएनआय वृत्त वाहिनीने ट्विटरवर शेअर केल्यानंतर ते वेगाने व्हायरल झाले आहेत. सलिमाने ज्या परिस्थितीत राहून हॉकी मध्ये यश मिळविले ते त्यामुळे अपार कौतुकाचे ठरले आहे. परिस्थितीवर मात करून तिच्या टीमने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला हॉकी टीम भले ब्राँझ पदकपासून दूर राहिली असली तरी आज देशवासियांच्या मनात या खेळाडूच्या बद्दल अभिमानाची भावना आहे. त्यातही टोक्यो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी या महिला खेळाडूंची नावेही फारशी कुणाला माहिती नव्हती पण आता त्यांच्या जिद्दीच्या कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. भले या टीमला इतिहास रचता आला नाही पण प्रथमच ऑलिम्पिक मध्ये या पातळीवर पोहोचण्याची मोठी कामगिरी त्यांनी बजावली आहे हे नाकारता येणार नाही.

झारखंडच्या सीमदेगा जिल्ह्यात बडकीछापर या छोट्या गावात सलिमाचे हे अगदी साधे छोटे घर आहे. तिच्या घराचे फोटो प्रसिद्ध होताच ते पाहणारे लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. या हॉकी खेळाडूच्या घराची दयनीय अवस्था लोकांना अस्वस्थ करून गेली आहे.

२०१६ मध्ये सलिमाची निवड ज्युनियर भारतीय महिला हॉकी टीम मध्ये झाली आणि २०१८ मध्ये युथ ऑलिम्पिक ज्युनियर टीमची कप्तान म्हणून ती निवडली गेली. या स्पर्धेत संघाने रजत पदक मिळविले होते. सलीमाच्या खेळातील सातत्य पाहून २०१९ मध्ये तिची निवड महिला सिनिअर टीम मध्ये झाली आणि त्यातून तिची ऑलिम्पिक साठी निवड झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो येताच प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.