Tokyo Olympics : कुस्तीपटू बजरंग पुनिया सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकाची आशा कायम


टोकियो – भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे. तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवशी बजरंगचा सामना झाला. अझरबैजानच्या कुस्तीपटूने या सामन्यात बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी रौप्यपदक जिंकले.

पहिल्या फेरीत बजरंग पुनिया १-४ ने पिछाडीवर होता. त्याने दुसऱ्या फेरीत काही चांगले डावपेच खेळले. पण हाजी अलीवने या फेरीतही गुण घेत आपली आघाडी वाढवली. दोन मिनिटे असताना बजरंगने चॅलेंज घेतले, पण ते अयशस्वी ठरले. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करून ६५ किलो वजनी गटात इराणच्या मुर्तझा चेका घियासीवर विजय नोंदवला होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.

कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या पुरुष फ्रीस्टाइल प्रकारातील कामगिरीकडे देशाचे लक्ष होते. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला. २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते.