राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले असून यापुढे हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दिली आहे. मोदींनी ही माहिती मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांचे या पुरस्काराला नाव दिले आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावे बदलणे आणि त्यातून काय मिळवायचे आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये, असे संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

पंतप्रधानांच नाव मोटेरा स्टेडियमला देण्यात आल्याचे विचारले असता, ही त्यांची भूमिका आहे. भाजपने ठरवले असेल एखाद्याचे नाव द्यावे किंवा बदलावे त्यांचे सरकार आहे, बहुमतातील सरकार असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

जी पदके आपल्याला मिळत आहेत, ते काय एखाद्या राजकीय पक्षाचे यश नाही. हे निवडणुकांचे यश नाही. हे त्या खेळाडूने, त्या त्या राज्याने केलेली मेहनत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्यामागे यंत्रणा काम करते. त्या सर्वांच्या मेहनतीमधून ती पदके आपल्याला मिळत आहेत, असे राऊत यांनी म्हटले.