मोदी सरकारकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावाचे नामकरण


नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने हा पुरस्कार ओळखला जाणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्काराचे नाव करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे असेल.

मेजर ध्यानचंद यांचा भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा असल्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.