मुंबईतील थुकरटांना महापालिकेचा दणका, आतापर्यंत केला ‘एवढ्या’ लाखांचा दंड वसूल


मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने जनजागृतीपर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येते.

कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे 200 रुपये दंड सध्या आकारण्यात येत असून, गेल्या सुमारे 9 महिन्यांमध्ये 19 हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून तब्बल रुपये 39 लाख 13 हजार 100 एवढी दंड वसुली करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी ही माहिती दिली आहे.

उच्च न्यायालयाद्वारे याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि सुरक्षित अंतर राखावे, असं आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागातून सर्वाधिक दंड वसुली करण्यात आली आहे. या विभागात 6 लाख 15 हजार 800 रुपये एवढी वसुली करण्यात आली आहे. या खालोखाल ‘एल’ विभागातून 06 लाख 12 हजार 200, तर ‘सी’ विभागातून 4 लाख 52 हजार 200 एवढी दंड वसुली करण्यात आली आहे.